Financial Technology : जो बदला नहीं वह टिका नहीं ह्या उक्तीनुसार सर्वच क्षेत्रात आताशा तंत्रज्ञान वेगाने शिरले आहे. हा बदल गेल्या 20 वर्षात मोठ्या वेगाने घडत जातो आहे. तसेच हा बदल सकारात्मक आणि वेळ वाचवणारा आहे. फायनान्स क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी सातत्याने येत असतात. तंत्रज्ञान अनेक प्रकारे ह्या क्षेत्रात क्रांती घडवत आहे.
अर्थक्षेत्रात तंत्रज्ञानाची कशी मदत होते आहे ते पाहुयात –
ऑटोमेशन (Automation) : ऑटोमेशनच्या मदतीने, डेटा एंट्री, अकाउंट रिलेटेड एंट्री क्रॉस चेकिंग आणि ग्राहक ऑनबोर्डिंग यांसारखी नियमित चालणारी कामे अधिक जलद आणि अचूकपणे पार पाडली जाऊ शकतात. ऑटोमेशन चुका टाळायला मदत करतेच पण तर कर्मचार्यांना बाकी अधिक महत्वाच्या कामावर वेळ देण्यास मदत होते.
मोबाइल बँकिंग (Mobile Banking) : आताशा सुपरिचित असलेल्या मोबाइल बँकिंगमुळे ग्राहकांना बँक अकाउंट ऍक्सेस करणे आणि कोणत्याही वेळी कोठूनही व्यवहार करणे सोपे झाले आहे. सुविधा वाढल्या असल्याने ग्राहक खुश तर मनुष्यबळावरचा ताण कमी झाला असल्याने यंत्रणा खुश.
ऑनलाइन पेमेंट (Online Payment) : ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मची महती आताशा आपल्याला सर्वानाच पटली आहे. रोख किंवा चेक न वापरता पेमेंट करणे सोपे झाले आहे. पेमेंट करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी झाली आहे आणि बिझनेस करणाऱ्यांना ग्राहकांकडून पेमेंट प्राप्त करणे सोपे झाले आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) : अजून पुरेसे आपल्याकडच्या व्यवस्थेत ही यंत्रणा रुजली नाही पण ह्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा तयार करण्याची आणि फायनान्स सेक्टरमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे. ब्लॉकचेन फसवणूक कमी करण्यास, ग्राहकांसोबतची पारदर्शकता वाढविण्यात आणि आर्थिक व्यवहार सुव्यवस्थित करण्यात मदत करू शकते.
डेटा विश्लेषण (Data Analysis) : डेटा आता किती महत्वाचा असतो हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. डेटा विश्लेषण केल्याने आर्थिक संस्थांना होणारे अनेक फायदे आहेत. ग्राहकांच्या अर्थवर्तनाचे विश्लेषण करण्यात, खर्च करण्याचे किंवा सेव्हिंग करण्याचे ट्रेंड ओळखण्यात आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात डेटा विश्लेषण जास्त मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. ह्यामुळे चांगल्या प्रकारे रिस्क मॅनेजमेंट, चांगला कस्टमर फीडबॅक आणि त्यायोगे व्यावसायिक नफा मध्ये वाढ हा सर्वात मोठा फायदा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फायनशील यंत्रणांमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेस ऑटोमेशन करण्यास, होऊ शकणारी फसवणूक टाळण्यास आणि ग्राहकांचे अनुभव पर्सनलाइज्ड करण्यात मदत करू शकते. उदाहरणार्थ, एआय-चालित चॅटबॉट्स ग्राहकांना त्वरित मदत आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधून देते.
एकूण काय तर तंत्रज्ञानामुळे फायनान्स सेक्टर अधिक कार्यक्षम, ग्राहक-केंद्रित आणि सुरक्षित होण्यास मदत होते आहे.