What Is MICR Code : बँकेत खाते असणाऱ्या प्रत्येकाला चेकबुक (Cheque Book) मिळू शकते. मुख्यत्त्वे करून पैसे अदा करण्यासाठी चेकचा वापर केला जातो. कोणत्याही बँकेचे चेकबुक आपण पाहिले तर त्यावर असणारे डिटेल्स जवळपास सारखेच आणि त्याचे डिझाईन सुद्धा थोडेफार सारखेच असते. सगळ्या चेक्समध्ये युनिफॉर्मिटी हवी ह्यासाठी असे नियम असतात. बँकेचे नाव, ब्रँचचे नाव, बँकेचा IFSC कोड ह्याच बरोबर तारीख, पैसे ज्याला घ्यायचेत त्याचे नाव टाकण्यासाठी जागा, किती पैसे द्यायचे ह्यासाठी अक्षरी आणि आकड्यातली टाकण्यासाठी जागा, सही करण्यासाठी जागा, ह्याच सोबत चेक क्रमांक आणि अजून काही आकडे खालच्या बाजूला प्रिंट केलेले असतात. त्यात एक पहिला क्रमांक असतो तो चेकचा क्रमांक. त्यानंतर एक क्रमांक असतो तो म्हणजे MICR कोड.
MICR हे अत्याधुनिक तंत्रज्ञान –
MICR कोड चा लॉन्ग फॉर्म म्हणजे अर्थ पाहायचा झाला तर “Magnetic Ink Character Recognition” (MICR).
MICR हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. चेकच्या खालच्या स्ट्रीपमध्ये मुद्रित केलेला 9-अंकी कोड चेकच्या प्रक्रियेला गती आणण्यासाठी आणि चेक त्वरीत अचूकपणे ओळखण्यासाठी वापरला जातो. भारतातील बँकांचे स्वतःचे MICR कोड आहेत. क्रॉस-बॉर्डर फंड ट्रान्सफरसाठी मोठ्या प्रमाणावर MICR चा वापर होतो. त्यात वापर केलेला फॉन्ट हा वेगळ्या प्रकारचा असल्याने आणि त्यावर वापरलेल्या चुंबकीय प्रकारच्या शाईच्या वापरामुळे सहजपणे कॉपी करणे अवघड असते.
9 अंकी असलेला MICR कोड हा ECS च्या प्रोसेस मध्ये वापरला जातो. 3 भागात विभागणी असलेला हा 9 अंकी एकसलग असा कोड असतो. ह्यातले पहिले 3 अंक शहराचा कोड दर्शवतात तर मधले 3 अंक बँकेचा कोड दर्शवतात. शेवटचे 3 अंक हे बँकेच्या शाखेचा कोड दर्शवतात.
आताशा पूर्वीसारखा चेकचा वापर जरी कमी झाला असला तरी मोठमोठ्या व्यवहारांसाठी आणि मोठ्या काळासाठीच्या व्यवहारांसाठी चेकचा वापर सुरक्षित समजला जातो. चेक लिहिताना काळजीने लिहा, चुका टाळा, आर्थिक कागदपत्रे समजून घेऊन त्यांचा वापर करा.