Home Insurance : दो दीवाने शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढते हैं एक आशियाना ढूँढते हैं 1977 साली अमोल पालेकर अभिनित असलेला घरोंदा सिनेमा मधले हे गाणे. घर घेण्यापूर्वी अनेकांना आठवत असेल. स्वप्नातले घर अनेकांसाठी एकमेव असते. बंगला असो की फ्लॅट प्रत्येकासाठी त्याची किंमत खूप मोठी असते. पण आपण अश्या घराचा विमा (Insurance) काढतो का?? गृहविमा ही आपल्या देशात अजूनही नवीन अशी संकल्पना आहे. त्याचे महत्व आपण अजूनही समजू शकलो नाहीये. अर्थात ते नाकारता पण येणार नाही.
जाणून घ्या होम इन्शुरन्सबद्दल –
आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आपण सगळे काढतो. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने किमान एक पॉलिसी काढलेली असते. कोणतीही अघटित घटना घडली तर आपल्यामागे आपल्या कुटुंबाची काही ना काही व्यवस्था लागावी ह्यासाठी जीवनविमा आपण काढून घेतो. पण आपण ज्या घरांमध्ये राहतो त्या घरांसाठी आपल्याला तसे का बरे वाटत नाही? साठवलेली पुंजी खर्चून आणि कर्ज काढून जेंव्हा आपण घर घेतो, तेंव्हा त्या घराकरिता कोणत्याही आपत्तीपासून वाचविण्यासाठी गृहविमा काढणे तर अगदी आवश्यक आहे.
तसे पाहायला गेलं तर होम इन्शुरन्स (Home Insurance) तितका काही महाग नसतो. गृहविम्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार – बिल्डिंग स्ट्रक्चर म्हणजे इमारतसंरचना पॉलिसी आणि दुसरा प्रकार – घरामधील साहित्याचा इन्शुरन्स. पहिल्या प्रकारात बिल्डिंगच्या ढाच्याचा आणि फिक्स असणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच स्ट्रक्चरसंदर्भात विमा उतरवला जातो तर दुसऱ्या प्रकारात घरातील वस्तू/साहित्य जसे की घरातील फर्निचर, दागिने, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादींचा समावेश इन्शुरन्स पॉलिसी.
नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळविण्यासाठी सुद्धा घराचा विमा उतरविता येतो ज्या मध्ये आग लागणे, वीज कोसळणे, वादळातले नुकसान, भूकंप तसेच काही पॉलिसीत आतंकी हल्ला, दरोडा ह्याबद्दल सुद्धा विमा उतरविण्यासंदर्भात तरतुदी असतात. साधारणतः बाजारात उपलब्ध असलेल्या गृह विमा पॉलिसी प्रति दहा लाख रुपयाला 1000 ते 1200 च्या दरम्यान वार्षिक प्रीमियम चार्ज करून गृह विमा करून देत आहेत.
आपल्या नोंदणीकृत इन्शुरन्स ऍडव्हायझरशी बोलून अधिक माहिती करून घ्यावी आणि आपलं सपनोका घर विमा संरक्षित करून घ्यावे.