What is Demonetization : सध्या अचानक काय होईल अन काही नाही हे सांगताच येत नाही. भारतामध्ये 8 नोव्हेंबर 2016 मध्ये रात्री 8 वाजता अशीच अचानक एक घोषणा झाली होती. “आज रात्री बारा वाजल्या नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा बाद होतील.” ही प्रसिद्ध घोषणा कोणाच्या स्मरणात नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता सर्व टेलिव्हिजन चॅनलवर लाईव्ह येऊन ही घोषणा केली होती. त्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. तो आणीबाणीचा काळ कोण विसरू शकत. अनेकांची पैशांसाठी झालेली पळापळ, एटीएम मध्ये लोकांच्या असलेल्या मोठमोठ्या रांगा. त्याकाळात नोटबंदी किंवा Demonetization हे शब्द वारंवार कानावर पडू लागले. बातम्यांतून, वर्तमानपत्रांतून जिकडे पाहावं तिकडे हेच. पण नोटबंदी म्हणजे नेमकं काय आणि नोटबंदी का केली जाते? हे तुम्हाला माहित आहे?
नोटाबंदी म्हणजे काय?
नोटाबंदी म्हणजे अस्तित्वात असलेले चलन व्यवहारातून काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा एखादे राष्ट्र चलनात बदल करते किंवा एखादे चलन बाद करते तेव्हा अशी प्रक्रिया घडते. बहुतेकदा त्याजागी नवीन चलन किंवा नव्या स्वरूपातील जुने चलन आणले जाते. काहीवेळा, एखादा देश पूर्णपणे जुन्या चलनाच्या जागी नवीन चलनात बदल करतो.
नोटबंदी का केली जाते?
कुठलीही नोटबंदी किंवा चलन बदल हा अर्थव्यस्थेचा वेग थोडा मंदावणारा ठरतो. ज्या देशांमध्ये रोखीच्या व्यवहारांवर जास्त भर दिला जातो, म्हणजे रोखीने होणारे व्यवहार मोठ्या प्रमाणात आणि त्यावर कुठलाही निर्बंध नसतो अशा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नोटबंदी किंवा चलन बदल हा ताण निर्माण करतो. नोटबंदी करण्यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेत रोखीत फिरणाऱ्या चलनावर नियंत्रण आणणे तसेच जी रोख रक्कम बँकिंग व्यवस्थेतून न फिरल्याने अन-अकाउंटेड म्हणजे अर्थव्यवस्थेत नोंदली न गेलेली आहे, ज्याला ढोबळ मानाने काळा पैसा म्हटला जातो अशा रकमेला नियंत्रण आणण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. तसेच जीर्ण झालेले चलन काढून टाकण्यासाठी आणि नव्याने चलनाच्या नोंदी होण्यासाठी चलन बदल किंवा नोटबंदी (Demonetization) केली जाते.
विकसित राष्ट्रांमध्ये अत्याधुनिक चलनव्यवस्था किंवा आर्थिक व्यवहार प्रणाली वापरली जाते अशा राष्ट्रांमध्ये सुद्धा जर अर्थव्यवस्थेतले व्यवहार रोखीने होत असतील आणि त्याची नोंद अर्थ यंत्रणेमध्ये (बँकिंगमध्ये) होत नसेल तर अशा राष्ट्रांमध्ये सुद्धा चलन बदलाची वेळ येतेच. अनेकदा असे म्हटले जाते की, नोटबंदी भ्रष्टाचार कमी करण्यास फायदेशीर ठरते, तसेच त्यामुळे काळा पैसा बाहेर येतो अथवा चलनांतून बाद होतो. परंतु याबद्दल अजूनही ठोस आणि भक्कम अशी खात्रीशीर माहिती नाही.
भारतातील गाजलेल्या नोटबंदीनंतर बराच गहजब झाला पण म्हणतात ना भारतीय माणूस प्रतिकूल परिस्थितीत देखील सातत्याने पुढे जातो. त्यानुसार भारतात डिजिटल व्यवहारांची सुरुवात झाली आणि जनतेच्या अंगवळणी पडली. याचा फायदा म्हणजे छोटे छोटे व्यवहार देखील डिजिटली होऊ लागले. युपीआय ही व्यवस्था याच काळात बहरली आणि कोरोनाकाळात वाढली. अजूनही व्यवस्थेमध्ये रोख चलनात अनेक व्यवहार होत आहेत, पण सामान्य जनतेची मानसिकता रोखीपेक्षा डिजिटल व्यवहारामध्ये बदलायला लागली आहे.