Home Loan : घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ही कविता अनेकांना आठवत असेल. घराचे स्वप्न पूर्ण होणे अनेकांसाठी आयुष्यभराची कमाई असते. घर घेण्यासाठी पुंजी साठवत राहणे, सोने गहाण टाकणे, PPF मधून पैसे उभे करणे अश्या अनेक गोष्टी सामान्य माणूस करत असतो. हे सगळे झाल्यावर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ढीगभर कागदपत्रे आणि अनंत हेलपाटे घालून माणूस दमून जातो.
रेपो रेटमध्ये वाढ –
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्प (Budget 2023) आणि रेपो रेटमध्ये (Repo rate) झालेल्या वाढीनुसार गृह कर्ज (Home Loan) आता महाग होण्याची लक्षणे आहेत. RBIने (Reserve Bank of India) रेपो दरात 0.25 टक्क्यांनी केलेल्या वाढीमुळे आता सामान्य माणसाचे घराचे स्वप्न जरा महागणार आहे.
सलग सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ –
गेल्या वर्षभरात साधारण 5-6 वेळा ह्या दरात वाढ झाली आहे. तसेच बांधकामाच्या साहित्य दरात सातत्याने होत असलेली वाढ ही पण घराच्या किमती वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये महत्वाचे कारण आहे. वाढलेल्या Repo Rate मुळे नवीन गृहकर्ज घेणार्यांना, तसेच ज्यांनी फ्लोटिंग रेट कर्ज (Floating Rate Loans) घेतले आहे त्यांच्यावर कर्जाच्या व्याजावर परिणाम होऊ शकतो.
घर खरेदी महागणार –
बांधकाम क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार घराच्या किमती वाढल्यास परवडणारी घरं सुद्धा आवाक्याबाहेर जाऊ शकतील. ज्यांनी घरे घेतली आहेत त्याची पण गृहकर्जे दर आता वाढण्याची शक्यता आहे. अर्थात नव्याने घेतले जाणारे गृहकर्ज, वाहन कर्ज इत्यादींसाठी कर्जाच्या दरांवर परिणाम होईल, परंतु प्रत्यक्षात, कर्ज पुरवठादार चालू असलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी म्हणजे EMI साठी मुदत वाढवण्याची शक्यता आहे. अजूनही ह्यावर जास्त अशी काही माहिती बाहेर न आल्याने रेपो दरवाढीचा नेमका परिणाम स्पष्ट होणे बाकी आहे.
आता येणाऱ्या काळात स्वतःचे हक्काचे घर व्हावे ही इच्छा असणाऱ्यांना थोडं नियोजनपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतील हे मात्र खरे.