Silicon Valley Bank Crisis : अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बातमीने (Silicon Valley Bank Crisis) आपल्याकडे चांगलीच खळबळ माजली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक अडचणीत आल्याचा फटका आपल्या SVC बँकेला बसला आहे अशी बातमी आली आणि ग्राहकांचे धाबे दणाणले. परंतु SVC बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (Silicon Valley Bank) अडचणींचा SVC बँकेला कोणताही फटका बसला नसून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे बँकेने निवेदनात म्हंटले आहे. केवळ नामसाधर्म्य म्हणजे मूळ नावाच्या इनिशिअल्सला घेऊन गोंधळ उडाला असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे बँकेचे म्हणणे आहे. SVC बँक म्हणजे पूर्वीची शामराव विठल सहकारी बँक.
SVC बँकेचा 116 वर्ष जुना इतिहास –
1906 साली जेव्हा भारत पारतंत्र्यात होता आणि सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा महात्मा गांधींनी उच्चारला त्या वर्षी भारतात एक बँक (Bank) सुरु झाली. सहकार महर्षी कै. रावबहादूर श्रीपाद सुब्बाराव तालमकी ह्यांच्या पुढाकारातून ही बँक सुरु झाली. त्यांनीच पुढे बँकेला त्यांच्या गुरुचे म्हणजे कै शामराव विठ्ठल कैकिणी ह्यांचे नाव दिले. सहकार कायद्याखाली सहकारी पतसंस्था म्हणून साधारण डिसेंबर 1906 रोजी नोंदणीकृत संस्था झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिक गोष्टींची, बँकिंगची माहिती कमी प्रमाणात होती. सहकार चळवळ पण आजच्या इतकी मूळ धरलेली नव्हती. त्या काळात सुरु झालेल्या बँकेनं आज चांगलीच प्रगती केलेली आहे. भारतभर जवळपास 198 ब्रॅंचेस असलेली ही बँक आज शेड्युल्ड बँक आहे. 1988 साली बँकेला शेड्युल्ड बँक असे स्टेट्स प्राप्त झाले. सहकार तत्वावर चालू झालेली बँक आज कॉर्पोरेट पद्धतीने काम करत आहे. सहकारी पातळीवरील बँकेचे स्वतःचे ग्राहक भांडार 1910 साली सुरु झाले आहे. बँकेचे स्वतःचे बँकिंग सॉफ्टवेअर आहे जे अनेक को-ऑपरेटिव्ह बँक वापरत आहेत. SVC बँकेचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या बँकांची संख्या जवळपास 25’च्या वर आहे.