New Job And Saving : काय सांगताय…! मुलाला नोकरी मिळाली तुमच्या…अगं छानच की … लेकीला जॉब मिळाला तुझ्या मस्तच की.
जॉब, नोकरी मिळाली की अनेकांना आता सेटलमेंट सुरु अशी भावना होते. एका अर्थी हे खरं आहे. शिक्षणानंतर नोकरी किंवा सुरु केलेला व्यवसाय हा भविष्याकडच्या वाटचालीची सुरुवात म्हणून समजला जातो.
पण खरे भविष्य हे नोकरी किंवा सुरु केलेला व्यवसाय ह्यापेक्षा बचतीच्या मार्गावरून सुरक्षित बनते. बचतीच्या मार्गांचे शिक्षण ह्याच काळात मिळणे आवश्यक आहे.
नोकरीला लागल्यावर सर्वात प्रथम एक गोष्ट करावी ती म्हणजे गरजा आणि आवश्यकता ह्याची यादी करून मगच खर्च करायला सुरुवाट करावी.
काही टिप्स नव्याने नोकरीला लागणाऱ्यांसाठी ह्या निमित्ताने शेअर करत आहोत.
नवीन नोकरीला लागणाऱ्यांसाठी बचतीच्या काही टिप्स –
- नोकरीला लागल्यावर मिळणाऱ्या पगाराचे आणि खर्चाचे गणित आधी कागदावर मांडावे.
- सेव्हिंग करण्यासाठीची रक्कम निश्चित करून मग उरलेल्या पैश्याच्या खर्चाचे नियोजन करावे.
- दैनंदिन खर्चासाठीची रक्कम आणि मासिक खर्चाची फिक्स रक्कम बाजूला काढून उरलेले पैसे बचतीच्या विविध मार्गांचा उपयोग करून खर्चावे.
- पोस्टाच्या सेव्हिंग स्कीम्स, SIP, विमा वगैरे गोष्टींचा अभ्यास करून एकेक गोष्टीत गुंतवणूक सुरु करावी.
- ह्याचसोबत अडचणीच्या गोष्टींसाठी किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लागणारी एखादी रक्कम कमाईच्या काही टक्के बाजूला काढून ठेवावी. नव्याने नोकरीला लागणाऱ्या मंडळींना हे जरा अवघड जाऊ शकते.
- हेल्थ इन्शुरन्स साठी काही रक्कम निश्चितपणे गुंतवावी.
- शिक्षणविषयक कर्ज घेतलेलं असल्यास त्याच्या परतफेडीचे नियोजन आधी लावणे आवश्यक ठरते.
- लग्न किंवा तत्त्सम गोष्टींसाठीच्या पूर्तीसाठी कमाईच्या काही टक्के रक्कम बाजूला आधीपासून काढून ठेवावी.
- जसजशी कमाई वाढायला लागेल तसतसे सेव्हिंग वाढवणे आवश्यक ठरेल. साधारण वाढलेल्या कमाईचा 15% हिस्सा हा नव्या सेव्हिंग साठी वापरला जावा.
वर सांगितलेल्या टिप्स ह्या ढोबळ स्वरूपाच्या असून बचतीची मानसिकता तयार व्हावी ह्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. कष्टाची कमाई आणि खर्चाचे आकडे ह्यात कायमच तफावत आढळत असते. तरीही उत्तम नियोजनाने बचतीची उद्दिष्ट्ये गाठणे सोपे होते.